गूरूपरंपरा उपक्रमणिका

श्रीः श्रीमते शठकोपाय नमः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद् वरवरमुनये नमः

श्रीरंगनाथ – पेरिय पेरुमाळ् – प्रथम आचार्य
आळवार आणि आचार्य परम्परा – श्रीरामानुज-केन्द्रित

लक्ष्मीनाथ समारम्भां नाथयामुन मध्यमाम् |
असमदाचार्य पर्यंतां वन्दे गुरुपरंपराम् ||

मी श्रीमन् नारायण पासून आरंभ होऊन, नाथमुनि आणि यामुनाचार्य हे मध्यभागी असून, माझ्या आचार्यांपर्यंत असणाऱ्या गौरवशाली गुरुपरंपरेची वंदना करतो. कूरेश (कूरत्ताऴ्वान्) यांनी हा दिव्य श्लोक आपल्या गुरुपरंपरेचा गौरव करण्यासाठी रचला. त्यांच्या मते, अस्मदाचार्य म्हणजे रामानुजाचार्य (एम्पेरुमानार्) कारण रामानुजाचार्य हे त्यांचे आचार्य होते. पण सर्वसाधारणपणे, अस्मदाचार्य म्हणजे हा श्लोक म्हणणाऱ्याचे आचार्य असा अर्थ होतो.

आपले दर्शन (श्री सम्प्रदाय) “एम्पेरुमानार् दर्शनम्” (रामानुजाचार्यांचे दर्शन) अशा नावाने नम्पेरुमाळ् यांच्याकडून ओळखले जाते – हे मणवाळ मामुनिगळांनी (श्री वरवरमुनि) उपदेशरत्नमालेत दाखवले आहे.

श्री रामानुजाचार्य आपल्या आयुष्यकाळात सनातन धर्माची – म्हणजे शाश्वत जीवनमार्गाची – पुनःस्थापना केली. त्यांनी आपल्या पूर्वज नाथमुनि, यामुनाचार्य वगैरेंकडून हा संदेश घेतला आणि तो अगदी सरळ, सर्वांना समजेल अशा पद्धतीने सगळ्यांसमोर मांडला.

गुरू आणि आचार्य हे समानार्थी शब्द आहेत. गुरू म्हणजे जो अज्ञान दूर करतो. आचार्य म्हणजे ज्याने शास्त्राचा अभ्यास केला आहे, जो स्वतः त्याचे पालन करतो आणि इतरांनाही त्याचे पालन करायला लावतो. गुरू परंपरा म्हणजे आचार्यांची अखंड वंशपरंपरा (साखळी) होय. आपली श्रीवैष्णव गुरू परंपरा स्वतः श्रीमन् नारायण यांच्यापासून आरंभ  होते, जसे आपण ‘लक्ष्मीनाथ समारंभाम्’ या श्लोकात पाहतो. श्रीमन् नारायणाच्या असीम कृपेमुळे, त्यांनी स्वतः संसारी जीवांच्या (या भौतिक जगात अडकलेल्या जीवात्म्यांच्या) मनातील अज्ञान दूर करण्याचे उत्तरदायित्व घेतले, जेणेकरून त्यांचे रक्षण करता येईल आणि त्यांना परमपदातील (वैकुंठातील) शाश्वत आनंदमय जीवन प्रदान करता येईल. म्हणूनच, ते आपल्या गुरू परंपरेतील पहिले आचार्य बनले आणि त्यांनी शास्त्रातील मौल्यवान अर्थ शिकवले.

शास्त्रात घोषित केले आहे की— ‘तत्त्वज्ञानान् मोक्ष लाभः’ (अर्थात तत्त्वज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते). वास्तविक ज्ञान प्राप्त करून आपण मुक्त होतो. आज आपल्याकडे असलेले हे सर्व वास्तविक ज्ञान आपल्याला आध्यात्मिक गुरूंच्या या अखंड साखळीद्वारे (परंपरेद्वारे) मिळाले आहे. म्हणूनच, आपल्या आचार्यांबद्दल अधिक जाणून घेणे आणि त्यांच्या जीवनाबद्दल तसेच त्यांच्या उपदेशांबद्दल नेहमी चर्चा करणे अत्यंत योग्य आहे.

श्रियःपती (श्री महालक्ष्मीचे पती) असलेले भगवान (एम्पेरुमान) श्रीमन् नारायण, जे अनंत, गरूड, विश्वक्सेन इत्यादी नित्यसुरींद्वारे सेवा केली जाणारे आणि आपल्या दिव्य महिषींसह (दिव्य पत्नी – श्री, भू, नीळा देवी) श्रीवैकुंठामध्ये शाश्वत निवास करतात, ते अनंतकल्याणगुणांनी परिपूर्ण आहेत. श्रीवैकुंठ (परमपद) हे शाश्वत आनंदाचे ठिकाण आहे, परंतु भगवान तिथे आनंद घेत असतानाही, त्यांचे हृदय संसारातील जीवात्मांकडे लागलेले असते (कारण ते तिथे दुःख भोगत आहेत). सर्व जीवात्मा, अर्थात अ) नित्य – जे नेहमी परमपदात असतात (कर्मामुळे कधीही संसारात आले नाहीत), ब) मुक्त – जे संसारात होते पण आता मुक्त झाले आहेत आणि क) बद्ध – जे कर्माने बांधले जाऊन संसारात आहेत, हे सर्व भगवंतांच्या अधीन आहेत आणि त्यांचे भगवंतांबरोबर समान नाते आहे (मुख्यतः – स्वामी-सेवक आणि पिता-पुत्र असे नाते). केवळ याच नात्यामुळे भगवान सर्व बद्ध जीवात्म्यांना श्रीवैकुंठात आणण्यासाठी आणि त्यांना शाश्वत कैंकर्यामध्ये (दिव्य सेवेमध्ये) सामावून घेण्यासाठी सतत सहाय्य करत असतात.

शास्त्रात स्पष्ट केल्या प्रमाणे, मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याकडे वास्तविक ज्ञान असणे आवश्यक आहे. वास्तविक ज्ञान स्पष्टपणे आणि नेमकेपणाने ‘रहस्य ग्रंथात’ कळवले आहे. जो कोणी संसाराच्या बंधनातून एका जीवात्म्याला मुक्त करणारे हे वास्तविक ज्ञान प्रदान करतो, त्याला आचार्य असे म्हटले जाते. आचार्याचे पद इतके गौरवशाली असल्याने भगवंतांना स्वतः आचार्य बनण्याची इच्छा असते. म्हणून ते प्रथम आचार्य बनले. आपल्या पूर्वाचार्यांद्वारे समजावले गेले आहे कि भगवंतांनी ३ ठिकाणी आचार्य पद घेतले:

  • बद्रिकाश्रमात भगवंतांनी नारायण ऋषींचा (आचार्य) अवतार घेऊन तिरुमंत्राची (अष्टाक्षरी मंत्र) उपदेश आपलाच अवतार असलेल्या नर ऋषी (शिष्य) यांना दिले.
  • भगवंतांनी ‘द्वय महामंत्र’  याचा उपदेश माता श्रीमहालक्ष्मी (पिराट्टि, श्रीदेवी)  यांना विष्णु लोकेत दिला (आपल्या श्रीवैष्णव गुरूपरंपराचा आरंभ करून दिला).
  • पार्थाचा सारथी (कृष्ण) होऊन भगवंतांनी अर्जुनाला गीता द्वारे चरम श्लोकाचा उपदेश कुरुक्षेत्रावर दिला.

पश्चात् सुंदर देशिक (पिन्बऴगिय पेरुमाळ् जियर्) यांनी लिहिलेल्या ‘६००० पडी  गुरु परंपरा प्रभावम्’ आणि लोकार्य मुनि (पिळ्ळै लोकम् जियर्) यांनी लिहिलेल्या ‘यतींद्र प्रवण प्रभावम्’ तसेच इतर पूर्वाचार्य ग्रंथांमध्ये स्पष्ट केल्यानुसार, आमच्या गौरवशाली गुरु परंपरेवर चर्चा करण्याचा हा आमचा एक नम्र प्रयत्न आहे.

अडियेन् वैष्णवी रामानुज दासी

आधार – https://acharyas.koyil.org/index.php/2012/08/16/introduction-english/

संगृहीत – https://acharyas.koyil.org/

प्रमेय (लक्ष्य) – https://koyil.org
प्रमाण (शास्त्र) – http://granthams.koyil.org
प्रमाता (आचार्य) – https://acharyas.koyil.org
श्रीवैष्णव शिक्षा/बालकों का पोर्टल – http://pillai.koyil.org

Leave a Comment