श्रीमन्नाथमुनि

श्री: श्रीमते शठकोपाय नमः श्रीमते रामानुजाय नमः श्रीमद्वरवरमुनये नमः श्री वानाचल महामुनये नम:

गुरूपरंपरा

<< पूर्व

श्रीमन्नाथमुनि – काट्टुमन्नार् कोयिल्

श्रीशठकोप स्वामी (नम्माऴ्वार्) यांच्या नंतर ओराण्वळि आचार्य परम्परामधले पुढचे आचार्य श्रीनाथमुनि स्वामी आहेत. 

श्रीमन्नाथमुनि – काट्टूमन्नार कोयिल् (वीरनारायणपुरम)

तिरुनक्षत्र  – आषाढ महिना, अनुराधा नक्षत्र

अवतार स्थळ – काट्टुमन्नार् कोयिल् (वीरनारायणपुरम्)

आचार्य – श्रीशठकोप स्वामी

शिष्यगण – उय्यक्कोणृडार्, कुरुगै कावलप्पन्, पिळ्ळै करुणाकर दासर्, नम्बि करुणाकर दासर्, एरु तिरुवुडैयार्, तिरुकण्णमंगै आण्डान्, वानामामलै दैवनायक आण्डान्, उरुप्पट्टूर् अचानपिळ्ळै, चोगतूराऴ्वान्, कीऴैयगताऴ्वान्, मेलैयागताऴ्वान्

ग्रन्थ : न्यायतत्वं, योग रहस्यम, पुरुष निर्णयम

श्रीमन् नाथमुनि स्वामी यांनी वीरनारायणपुरम मध्ये  ईश्वरभट्ट आऴ्वार् यांच्या घरी अवतार घेतला. श्रीमन् नाथमुनि स्वामींना श्रीरन्गनाथमुनि आणि नाथब्रह्म ह्या नावांनी देखील ओळखले जाते. 

श्रीमन् नाथमुनि स्वामी अष्टांग योग आणि दिव्य संगीत मध्ये विद्वान होते. तसेच, त्यांनीच ‘अरैयर् सेवा’ (arayar sEvai) सुरू केली, जी आजही तिरुवरंगम् (श्रीरंगम्), आऴ्वार् तिरुनगरी, श्रीविल्लिपुत्तूर् इत्यादी ठिकाणी केली जाते.

श्री नाथमुनि स्वामी आपले पिता (ईश्वरभट्ट आऴ्वार्), पुत्र (ईश्वर मुनि) आणि अन्य कुटुंबियांसोबत तीर्थयात्रे साठी मथुरा, वृंदावन, गोवर्धन पर्वत, द्वारिका, बद्रिकाश्रम, नैमिषारण्य इत्यादि ठिकाणी गेले आणि यमुना नदीच्या काठेवर भगवान यमुनैत्तुरैवर् (कृष्ण) ह्या स्वरूपा मध्ये सेवित आहेत अश्या एका गोवर्धनपुरम् गावा मध्ये त्यांनी  विश्राम केला. ऐके दिवशी श्री भगवान त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी काट्टूमन्नार् कयिल् येथे येण्याची आज्ञा केली आणि श्री नाथमुनि स्वामी परत आले. आपल्या मार्गावर त्यांनी वाराणसी, जगन्नाथ पुरी, सिंहाचाल, तिरूवेङ्कटम् (तिरुपती), घटिकाचलम्, कांचीपुरम् (आजू बाजू चे दिव्यदेश), तिरूवहिद्रपूरम्, तिरूकोवलूर्, तिरूवरंगम्, आणि तिरुकुडन्दै येथे मंगलाशासान करत करत शेवटी काट्टूमन्नार् कोयिल् येथे पोहोचले.  

 मेलनाडु (तिरुनारायणपुरम चा भाग) येथील श्रीवैष्णवांचा एक गट काट्टूमन्नार् कोयिल् ला भेट देतो आणि तेथील ‘मन्ननार्’ (काट्टूमन्नार् कोयिल्चे भगवान) यांच्यासमोर ‘तिरुवाय्मोऴि’ मधील “अरावमुदे…” हे पद (स्तोत्र) गातो. त्या पाशुरांच्या (पद्यांच्या) अर्थाने मंत्रमुग्ध झालेले नाथमुनी त्या श्रीवैष्णवांना त्याबद्दल विचारणा करतात, परंतु त्यांना त्या ११ पाशुरांव्यतिरिक्त इतर काहीही माहिती नसते. ते श्री नाथमुनी स्वामींना सांगतात की, जर ते ‘तिरुक्कुरगूर्’ला गेले, तर त्यांना अधिक माहिती मिळू शकेल. श्री नाथमुनी स्वामी भगवान मन्ननार् यांची आज्ञा घेऊन ‘आऴ्वार् तिरुनगरी’ ला पोहोचतात. तिथे त्यांची भेट ‘मधुरकवी आऴ्वार्’ यांचे शिष्य असलेल्या ‘पराङ्कुश दास’ यांच्याशी होते. ते श्री नाथमुनी स्वामी यांना ‘कण्णिनुण् चिऱुत्ताम्बु’ हे स्तोत्र शिकवतात आणि ‘तिरुप्पुळी आऴ्वार्’ (श्री शठकोप स्वामी जिथे वास्तव्यास होते ते चिंचेचे झाड) यांच्यासमोर सलग १२००० वेळा त्याचा जप करण्यास सांगतात. श्री नाथमुनी स्वामींनी यापूर्वीच ‘अष्टांग योग’ आत्मसात केलेला असल्याने, ते नम्माऴ्वारांचे ध्यान करत ‘कण्णिनुण् चिऱुत्ताम्बु’चा १२००० वेळा जप यशस्वीपणे पूर्ण करतात. श्री नाथमुनी स्वामींवर प्रसन्न होऊन श्री शठकोप स्वामी त्यांच्यासमोर प्रकट होतात आणि त्यांना अष्टांग योग, ४००० ‘दिव्य प्रबंधम’ आणि ‘अरुळिच्चेयल्’चा (दिव्य रचनांचा) संपूर्ण अर्थ यांचे ज्ञान प्रदान करून आशीर्वाद देतात. ज्याप्रमाणे परमेश्वरांनी श्री शठकोप स्वामी यांना दिव्य ज्ञानाचा आशीर्वाद दिला होता, त्याचप्रमाणे श्री शठकोप स्वामी यांनी श्री नाथमुनी स्वामी यांना तेच दिव्य ज्ञान प्रदान केले. श्री वरवरमुनि स्वामी यांनी ‘उपदेश रत्न माला’ मध्ये याच गोष्टीचा उल्लेख ‘अरुळ् पॆट्र नाथमुनी’ (ईश्वरी कृपा प्राप्त नाथमुनी) असा केला आहे.

श्री नाथमुनी स्वामी काट्टूमन्नार् कोयिल् येथे परततात आणि मन्ननार् भगवान यांच्यासमोर ४००० ‘दिव्य प्रबंध’ सादर करतात. भगवान मन्ननार श्री नाथमुनी स्वामींवर अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना ‘दिव्य प्रबंध’ चे वर्गीकरण करून त्याचा सर्वत्र प्रसार करण्यास सांगतात. श्री नाथमुनी स्वामी ‘अरुळिच्चेयल्’ (दिव्य प्रबंध) लयबद्ध करतात आणि कीऴैयगताऴ्वान् आणि मेलैयागताऴ्वान् या आपल्या भाच्यांना शिकवून त्यांच्या माध्यमातून त्याचा प्रसार करतात.

श्री नाथमुनी स्वामी हे दिव्य संगीतामध्येही निष्णात होते. एकदा, जेव्हा स्थानिक राजाला सामान्य गायक आणि दिव्य गायक यांच्यातील फरक ओळखणे कठीण झाले, तेव्हा नाथमुनींनी त्या दिव्य गायकाची ओळख पटवून दिली. जेव्हा राजाने त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला, तेव्हा नाथमुनींनी ४००० झांजा (cymbals) एकाच वेळी वाजवण्यास सांगितले. त्यांचे कौशल्य इतके प्रगाढ होते कि त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजावरून त्यांनी प्रत्येक झांजेचे वजन अचूकपणे सांगितले. राजाला त्यांच्या थोरपणाची जाणीव झाली आणि त्यांनी श्री नाथमुनी स्वामी यांना अमाप संपत्ती दिली, परंतु श्री नाथमुनी स्वामींनी त्या संपत्तीत कोणताही रस दाखवला नाही.

श्री नाथमुनी स्वामी यांना आलवन्दार (त्यांचे नातू) यांच्या आगमनाचा पूर्वभास होतो. ते आपला मुलगा ईश्वर मुनी यांना सूचना देतात की, त्यांनी त्या बालकाचे नाव ‘यमुनै तुरैवर’ (भगवान श्रीकृष्ण प्रती असलेल्या त्याच्या गाढ ओढीमुळे) असे ठेवावे. तसेच, ते आपल्या सर्व शिष्यांना असेही सांगतात की, त्यांनी यमुनै तुरैवर (जे पुढे आलवन्दार बनणार होते) यांना सर्व प्रकारचे ज्ञान प्रदान करावे.

श्री नाथमुनी स्वामी जेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असत, तेव्हा ते आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी विसरून जात होते. एकदा जेव्हा राजा आपल्या पत्नींसह श्री नाथमुनी स्वामीजी यांना भेटायला आला, त्या वेळी श्री नाथमुनी स्वामी योगावस्थेत (ध्यानात) मग्न होते, म्हणून राजा शांतपणे तिथून निघून गेला. परंतु, आपल्या शुद्ध भक्तीभावामुळे श्री नाथमुनी स्वामी यांना असे वाटले की, जणू श्रीकृष्ण आणि गोपिकाच त्यांना भेटायला आले आहेत  आणि ते त्यांच्या मागे धावू लागले.

एके दिवशी, शिकारीवरून परतताना राजा आपल्या पत्नीसह, एका धनुर्धारी व्यक्तीला आणि एका वानराला सोबत घेऊन श्री नाथमुनी स्वामींकडे आला. आपल्या प्रगाढ भक्तीभावामुळे श्री नाथमुनी स्वामी यांना असे वाटले की, हे साक्षात राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानच आहेत. ते त्यांच्या मागे धावू लागले, परंतु जेव्हा ते त्यांच्या नजरेआड झाले, तेव्हा श्री नाथमुनी स्वामी लगेच मूर्च्छित पडले. भगवंतापासून होणारा हा विरह सहन न झाल्यामुळे, त्यांनी त्याच क्षणी परमपद  (मोक्ष) प्राप्त केले. ही बातमी समजताच, ईश्वर मुनी आणि श्री नाथमुनी स्वामींचे शिष्य त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्यासाठी ‘चरम कैंकर्य’ (अंतिम संस्कार) विधी पूर्ण केले.

श्री नाथमुनी स्वामी यांनी ‘अरुळिच्चेयल्’ (दिव्य प्रबंध) पुन्हा मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे आज आपल्याला ‘श्रीवैष्णव संप्रदाय’ प्राप्त झाले. त्यांच्या प्रयत्नाशिवाय हे शक्य नव्हते . अलावन्दार यांनी आपल्या ‘स्तोत्ररत्न’ ग्रंथातील पहिल्या तीन श्लोकांमध्ये श्री नाथमुनी स्वामी यांच्या महिमेचे वर्णन केले आहे.

पहिल्या श्लोका मध्ये ते म्हणतात, “मी श्री नाथमुनी स्वामींची पूजा करतो जे अतुलनीय, विलक्षण आहेत, जे भगवान /आऴ्वार् यांच्या कृपेने ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या महासागराने भरलेले आहेत. 

दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात, “मी श्री नाथमुनी स्वामींच्या चरणकमळांची उपासना करतो, जे या संसारामध्ये आणि परमपद (मोक्षलोका) मध्येही माझा एकमेव आधार आहेत आणि ज्यांना ‘मधु’ राक्षसाचा वध करणाऱ्या (मधुसूदनाच्या) चरणकमलांविषयी पूर्ण ज्ञान व असीम प्रेम आहे.”

तिसऱ्या श्लोकात ते म्हणतात, “मी श्री नाथमुनी स्वामींना वंदन करतो, ज्यांच्या हृदयात अच्युत प्रती असीम प्रेम आहे, जे यथार्थ ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप आहेत, जे अमृताचा सागर आहेत, ज्यांनी इतरांच्या उद्धारासाठी या जगात अवतार घेतला आहे, जे भक्तीने परिपूर्ण आहेत आणि जे सर्व योगी जणांचे अधिपती आहेत.”

शेवटच्या श्लोकात ते भगवंताला म्हणतात, “कृपया माझ्या महान कामगिरीमुळे माझा स्वीकार करू नका, तर माझे आजोबा श्री नाथमुनी स्वामी यांच्यासाठी माझा स्वीकार करा ज्यांना तुमच्या चरणकमळांविषयी स्वाभाविक प्रेम आहे आणि ज्यांनी यथार्थ ज्ञानाचा पूर्णपणे बोध करून घेतला आहे.”

वरील ४ श्लोकांवरून आपल्याला श्री नाथमुनी स्वामींची खऱ्या थोरवीची जाणीव होते. आपण श्रीमान श्री नाथमुनी स्वामींच्या चरणकमळांजवळ अशी प्रार्थना करूया की, अच्युत आणि आऴ्वार् यांच्याप्रती तशीच ओढ आपल्यामध्येही निर्माण व्हावी.

श्री नाथमुनी स्वामींची तनियन

नमःचिन्त्यादभुताक्लिष्ट ज्ञान वैराग्य राशये ।
नाथायमुनयेगाध भगवद्भक्ति सिन्धवे ॥

अडियेन् शिल्पा रामानुज दासी

आधार – https://acharyas.koyil.org/index.php/2012/08/22/nathamunigal-english/

संगृहित – https://acharyas.koyil.org

प्रमेय (लक्ष्य) – https://koyil.org
प्रमाण (शास्त्र) – http://granthams.koyil.org
प्रमाता (आचार्य) – https://acharyas.koyil.org
श्रीवैष्णव शिक्षा/बालकों का पोर्टल – http://pillai.koyil.org

Leave a Comment